Is Grammar Necessary to Learn English? । इंग्लिश शिकण्यासाठी ग्रामर शिकावंच लागतं का?

तुम्हाला इंग्रजी शिकायचंय पण Grammar च नाव काढताच तुमच्याही अंगावर काटा येतो ना? आणि grammar शिकायलाच हवं म्हणून जबरदस्ती तुम्ही सुद्धा इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक विकत घेतलं, वाचायलाही घेतलं, पण ते वाचून पूर्ण करणं तर सोडाच पण साधी पहिली १० पानंही कधी वाचून झाली नाही! हो ना?

आता तुम्ही म्हणाल हे सगळं मला कसं माहीत? 

त्याचं काय आहे, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी धडपड करणाऱ्या इतर प्रत्येकाप्रमाणे मी देखील हे अनुभवलेलं आहे. आणि grammar साठीच्या च्या वाटणाऱ्या तिरस्कारापायी मी जवळजवळ माझं कॉलेज पूर्ण होई पर्यंत इंग्रजी शिकण्याचं मनावर घेऊ शकले नव्हते!

 

Grammar शिकण्यासंदर्भात असलेली दोन वेगवेगळी मते :

‘Is Grammar Necessary to Learn English?’ इंटरनेट वर या प्रश्नच उत्तर शोधायचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला दोन टोकाची मतं असलेले व्हिडिओस बघायला मिळतील, blogs वाचायला मिळतील. 

“असं कसं, ग्रामर हा जगातल्या कुठल्याही भाषेचा पाया आहे  ते तर सगळ्यात आधी शिकावं लागतं तरच ती भाषा बोलता येते”-हे झालं पहिलं मत. आणि दुसरं म्हणजे-” छे! English बोलणाऱ्या देशांमधले लोक थोडंच ग्रामर शिकत बसतात! जर ते ग्रामर न शिकता बोलू शकतात तर आपणही बोलू शकतो. म्हणूनच grammar शिकण्याची काहीच गरज नाही.” 

आता ही दोन्ही मतं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्या पैकी कितीतरी जणांच्या मनातला गोंधळ कायम राहतो, किंबहुना वाढतो असं म्हणायला हरकत नाही.  

मग नक्की काय करावं? ग्रामर शिकावं की नाही? 

Grammar का शिकावे आणि कसे शिकावे? । How to learn Grammar?

मत कुठलंही असो, सत्य परिस्थिती ही आहे की थोडं-फार ग्रामर हे आपल्या प्रत्येकाला शिकावंच लागतं!

आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं असू शकतं, की आपण मराठी भाषा व्याकरणाचा अभ्यास न करता शिकलो, आपल्या आईने आपल्या जन्मानंतर लगेच आपल्याला क्रियापद म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे असं कधीच शिकवलं नाही, मग इंग्रजी भाषा शिकताना हे सगळं का शिकायचं?

मित्रांनो, तुम्ही हे मान्य कराल, आपली मातृभाषा आईच्या गर्भात असल्यापासून आपल्या कानावर पडत असते. जन्म झाल्यानंतरही आपल्या आजूबाजूला almost सगळेच मराठी मध्येच संवाद साधत असतात. वयाची पहिली काही वर्ष जेव्हा आपल्याला बोलताही येत नसतं, आपल्याशी बोलताना आई,वडील, एकंदरीत सगळेच नातेवाईक मराठीतून आपल्याशी गप्पा मारतात! थोडक्यात आपल्या प्रत्येकाचा मराठी बोलण्यासाठीचा अभ्यास आईच्या गर्भात असल्यापासूनच सुरु झाला होता! आता जर मराठी प्रमाणे इंग्रजी सुद्धा grammar न शिकता बोलायचं असेल तर तुम्ही हे मान्य कराल की आपल्या आजूबाजूला किंवा घरी क्वचितच आपल्याशी कोणी इंग्लिश मध्ये संवाद साधेल, क्वचितच असा एखादाच दिवस असा असेल ज्या दिवशी २४ ही तास इंग्लिश मध्ये बोलण्याची वेळ आपल्यावर येईल. थोडक्यात आपल्याला ती भाषा शिकण्यासाठी तुलनेने बराच वेळ घालवावा लागेल. पण जर तुमच्याकडे हा वेळ नसेल, तर मात्र English grammar शिकावं लागेल. Grammar या शब्दाचा मुळात अर्थच आहे-भाषेचे नियम वापरण्याची पद्धती. आपण जे बोलतो मग ती कुठलीही भाषा का असेना, ते जर आपण आपले स्वतःचे नियम लावून बोलायचं ठरवलं तर समोरच्याला काहीच करणार नाही आपल्याला नक्की म्हणायचं काय. 

आपल्या बोलण्याला किंवा आपल्या वाक्यांना systematic बनवणं हेच ग्रामरचं काम आहे. 

एकदा भाषेतले नियम व्यवस्थित समजून घेतले तर ते वापरून खूप कमी वेळात ती भाषा बोलता येणं सहज शक्य आहे. 

आता तुमच्या लक्षात आलं असेल इंग्लिश शिकायचं असेल तर व्याकरण शिकणं का गरजेचं आहे!

पण मला ग्रामर शिकण्याची भीती वाटते, मग सगळं grammar मी कसं शिकू?

सगळ्यात आधी हा समज मनातून काढून टाका की इंग्रजी शिकण्यासाठी संपूर्ण ग्रामर तुम्हाला शिकावं लागेल!

ग्रामर शिक्षण गरजेचं आहे पण सगळंच्या सगळं ग्रामर शिकायची अजिबात गरज नाही. आपण इंग्रजीत बोलतो म्हणजे काय तर वाक्य इंग्रजीत बोलतो. आणि वाक्य हे शब्दांचं म्हणजेच words चं बनलेलं असतं. या शब्दांची व्यवस्थित मांडणी कळण्याइतपत ग्रामर शिकलात की बोलायला जमलंच म्हणून समजा! त्या करीता Noun, Subject, Object, Verb,Pronoun, adverb, adjective अश्या simple topics पासून तुम्ही सुरुवात करू शकता. यांव्यतिरिक्त पुढील topics चा अभ्यास ही तुम्ही करू शकता. 

Articles 

Conditionals

Conjunctions

Interjections

Wh-questions

Tenses

Degree of comparison

Modal Verbs

हळूहळू स्वतःला वेळ देऊन हे topics जर तुम्ही शिकून घेतले, त्यांचा सर्व केला तर खूप चांगल्या दर्जाचं इंग्लिश खूप कमी वेळात तुम्हाला बोलता येईल. 

आधी ग्रामर शिकून घेतलं आणि मग शब्द पाठ केले तर चालेल का?

आधी शब्द शिकू की ग्रामर असा प्रश्न बरेचदा विद्यार्थ्यांकडून विचारला जातो. पण “कोंबडी आधी की अंड” या प्रश्नासारखाच हा प्रश्नही मजेशीर आहे. 

आधी ग्रामर शिकायला सुरुवात केली पण वाक्यातल्या शब्दांची ओळख, त्यांचा अर्थ माहीत नसेल तर कुठलाही ग्रामर Rule कितीही वेळा वाचा समजणार नाही. आणि आधी नुसतेच शब्द पाठ करायचे म्हटलं तरी किती आणि कोणते शब्द पाठ करायचे हे लक्षात येणार नाही. तुमच्या माहीतीतल्या कित्येक जणांनी या पेचात अडकून इंग्लिश भाषा शिकणं सोडून दिलेलं तुम्ही पाहिलं असेल. म्हणूनच Grammar आणि  Vocabulary यांचा अभ्यास simultaneously करणं गरजेचं आहे. 

म्हणूनच सुरुवातीलाच संपूर्ण ग्रामर आणि सगळेच्या सगळे शब्द शिकण्याचा अट्टाहास न केलेलाच बरा!

इंग्रजी भाषेमध्ये जवळपास १ लाख ७२ हजार शब्द आहेत. पण त्यातले फक्त ३ ते ४ हजार शब्द आणि Basic Grammar यांची व्यवस्थीत सांगड घातलीत की, काही दिवसांच्या नियमित सरावाने तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकाल हे नक्की!

इंग्लिश शिकण्यासाठी best tips!….वाचण्यासाठी येथे click करा. 

एका महिन्यात इंग्रजी शिका … वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

2 thoughts on “ Is Grammar Necessary to Learn English? । इंग्लिश शिकण्यासाठी ग्रामर शिकावंच लागतं का?”

  1. Pingback: इंग्लिश शिकण्यासाठी बेस्ट टिप्स | Best Tips for Learning English – Englishabhyas

  2. Pingback: Can I learn English in a month? । एका महिन्यात इंग्रजी शिकता येतं का? – Englishabhyas

Comments are closed.