Can I learn English in a month? । एका महिन्यात इंग्रजी शिकता येतं का?

‘इंग्रजी ही एक भाषा आहे. कुठलीही भाषा केवळ एका महीन्यात ठरवून संपूर्णपणे शिकणं हे कोणासाठीही शक्य नाही. शिकण्यासाठी आयुष्य कमी पडेल इतका ‘भाषा’ हा विषय सखोल आहे.’ – हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. तरीही ‘मला इंग्लिश एका महिन्यात बोलता येईल का’ हा प्रश्न सगळीकडे विचारला जातो. 

जर तुम्ही एखाद्या Dietician कडे गेलात आणि त्यांना ‘माझं वजन एका महिन्यात कमी होईल का?’ असा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला एकच उत्तर ऐकायला मिळेल ते म्हणजे -’वजन कमी होईल का किंवा कधी कमी होईल हे सर्वस्वी तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. जेवढ्या प्रामाणिक पणे तुम्ही स्वतःवर मेहनत घ्याल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला fast किंवा slow results बघायला मिळतील. 

इंग्लिश शिकण्यासाठी सुद्धा हेच उत्तर लागू पडतं. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल त्यानुसार तुम्ही किती लवकर बोलू शकाल हे ठरतं. 

So, एका महिन्यात ही भाषा शिकण्याचं challenge तुम्हाला स्वतःला द्यायचंच असेल तर ध्येयं गाठण्यासाठी तुम्ही नक्की कुठल्या गोष्टी करायलाच हव्या ते बघूया. 

१.  स्पोकन इंग्लिश मध्ये बरेच प्रकार आहेत. त्यातल्या ४ categories आपण विचारात घेऊया.जेणेकरून तुम्हांला पुढचे निर्णय घ्यायला आणि त्याप्रमाणे Planning करायला सोपं जाईल.  Survival, Informal, Neutral, Formal. 

Survival English म्हणजे असं इंग्लिश जिथे अशी वाक्यं आणि phrases ची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता ज्यांच्यासाठी tenses चा फार विचार करावा लागत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात ही वाक्यं जशीच्या तशी बोलली जातात.

Informal English म्हणजे अशी वाक्य जी तुम्ही मित्रांशी गप्पा मारताना वापरता. अश्या वेळेला slang words चा जास्त उपयोग होतो. 

बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशन किंवा जिम अश्या ठिकाणी जेव्हा आपण अनोळखी माणसांना भेटतो तेव्हा त्यांच्याशी आपण आपल्या मित्रांशी बोलावं तसं बोलत नाही. फक्त वेळ जावा म्हणून केलेल्या संभाषणासाठी जी वाक्य आपण वापरतो त्यांचं वर्गीकरण तुम्ही  Neutral English मध्ये करू शकता. 

आणि Formal English म्हणजे असं इंग्लिश जे तुम्ही ऑफिस मध्ये, interviews मध्ये, तुमच्या मुलांच्या शाळेतल्या Principal शी संवाद साधताना तुम्ही बोलता. आपल्यापैकी जास्तीत जास्त जणांना या इंग्लिश ची प्रॅक्टिस करायची असते. And you will be surprised to know, हे इंग्लिश म्हणजे सर्वात सोपं इंग्लिश! कारण इकडे fixed phrases तुम्हाला शिकायच्या असतात म्हणजेच अशी वाक्यं आणि प्रश्न जे तुम्हाला जसेच्या तसे वापरायचे असतात. 

यांपैकी कुठल्या category ची प्रॅक्टिस करायची आहे हा तुमचा हा निर्णय एकदा झाला की त्या दिशेने तुम्ही पावलं उचलू शकता. 

२. स्वतःवर विश्वास ठेवा- तुम्ही हे करू शकता. 

कुठलीही गोष्ट आयुष्यात मिळवण्यासाठी Positive Mindset असणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर दृढ विश्वास असेल तर इंग्लिशचा काय कुठलीही भाषा तुम्ही सहज शिकू शकता.

३. चुका करायला घाबरू नका.- परकी भाषा शिकताना चुका होणं स्वाभाविक आहे. तसंही एका महीन्यात भाषेचे सगळेच्या सगळे नियम लक्षात राहणं शक्य नाही. झालेल्या चुका लक्षात यायला बरेचदा वेळ लागू शकतो. पण एकदा का एखादी चूक लक्षात आली कि पुन्हा पुन्हा करणं टाळा. तुमच्याच चुका तुम्हाला खूप काही  शिकवतील, तेव्हा चुका करायला  घाबरू नका. 

तुमच्या चुकांसाठी कोणी तुमच्यावर हसलं तर मनावर घेऊ नका. या जगात कोणीही Perfect नाही. तसंही भाषा हा विषय चुका करून आणि मग त्या सुधारूनच जास्त लक्षात राहतो. कुठेतरी मी या ओळी वाचल्या होत्या ज्या तुमच्याबरोबर share करायला खूप आवडेल.-”इंग्लिश हि केवळ एक भाषा आहे. कुठलीच भाषा कोणाचीही बुद्धिमत्ता, योग्यता किंवा पात्रता मोजण्याचे परिमाण असूच शकत नाही. तुमचा आत्मविश्वास कुठल्याही भाषेच्या येण्या-न येण्यावर अवलंबून असता काम नये.”

 जगातील प्रत्येक भाषा सरावाने जमतेच म्हणूनच तुम्हाला इंग्लिश आत्ता बोलता येत नसेल तरी लवकरच बोलता येईल.

स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, “Consistency is the key to success”. म्हणूनच तुमचे प्रयत्न अखंडपणे चालू ठेवा.

४. Be focused : या एका महिन्यात तुम्हाला प्रत्येक क्षण focused राहावं लागेल. स्वतःशी विचार करताना देखील इंग्रजीतच करावा लागेल. या महिन्यात प्रत्येक सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात जो वेळ तुम्हाला मिळतो त्याचा तुमच्या प्रगती साठी कसा उपयोग करता येईल याच नियोजन करा. तुम्हांला इंग्रजी शिकायला मिळेल केवळ याच उद्देशाने Social Media चा वापर करा. त्यासाठी अचूक इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला आवडतील असे चित्रपट बघा. आणि प्रत्येक नविन  शब्दाची नोंद ठेवायला विसरू नका. Listen,read,write,speak, repeat या मंत्राचा वापर करा. म्हणजेच प्रत्येक नवीन वाक्य असो किंवा शब्द, आपल्या वहीमध्ये लिहून त्याचे मनन करून बोलताना वापर करण्याचा प्रयत्न करा. कुठलीही भाषा ही सरावानेच जमू शकते म्हणूनच या चारही गोष्टींचा(Listen, Speak, Read, write) समतोल साधणं गरजेचं आहे. वाचन करताना शक्यतो मोठयाने करा. तुमच्या मेंदूबरोबरच तुमच्या जिभेलाही शब्दांची सवय होणं गरजेचं आहे. जी वाक्य तुम्ही वाचत आहात, ती कमीत कमी एकदा आरश्यात बघून स्वतःशीच बोलण्याचा प्रयत्न करा. काय वाचायचं हा प्रश्न पडला असेल तर आवडीची पुस्तकं घेऊन या. ते शक्य नसेल तर इंटरनेट वर उपलब्ध असलेले लेख,कथा वाचू शकता. 

Social Media वर मित्रमैत्रिणींशी बोलताना शक्य तेवढ्या इंग्रजी वाक्यांचा उपयोग करा. आणि हो! Sms language चा वापर पूर्णपणे टाळा. प्रत्येक वाक्य पूर्ण शब्दांमध्ये योग्य spelling सहित लिहा.  

वर्तमान पत्र वाचण्यासाठी तुम्हाला आजवर अनेकांनी सुचवलं असेल. जर तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला आवडत असतील तर इंग्लिश भाषेतली वाचा. पण जर तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला आवडत नसेल तर वाचू नका. एक लक्षात घ्या, आपला इंग्रजी शिकण्याचा प्रवास हा आपल्याला enjoy करता आला पाहिजे. त्यामुळे ज्या गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलीत होईल अश्या गोष्टी मनाविरुद्ध करणं टाळा. तुमचा हा प्रवास interesting कसा होईल याकडे तुमचा काळ असला पाहिजे.

५. कित्येकांसाठी Spoken English classes हा एक महागडा पर्याय ठरू शकतो, पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जरूर हा पर्याय निवडू शकता. मात्र Class लावला म्हणजे झालं! असं अजिबात नाही. उलट class मध्ये शिकवलेल्या प्रत्येक टॉपिक ची उजळणी तुम्हाला न चुकता करायचीच आहे. त्याचबरोबर स्वअभ्यासासाठीही वेळेचं नियोजन करायचं आहे. Class मधल्या शिक्षकांच्या संपर्कात राहा. तुमचा गृहपाठ वेळोवेळी त्यांच्याकडून तपासून घ्या. तुमच्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन ताबडतोब करून घ्या. क्लास मधल्या इतर वर्गमित्रांशी इंग्रजी मध्येच बोला. 

इंग्लिश शिकण्यासाठी Grammar शिकावंच लागतं  का?…वाचण्यासाठी येथे click करा. 

इंग्लिश शिकण्यासाठी best tips!….वाचण्यासाठी येथे click करा. 

अश्या पद्धतीने जर मिळणारा  प्रत्येक क्षण जर अभ्यासासाठी, सरावासाठी वाहून घेतला तर नक्कीच एका महिन्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्ही मिळवू शकता. केवळ एका महिन्यात संपूर्ण भाषा शिकणं अशक्य असलं तरी याच एका महिन्याचा कालावधी तुमच्या भावी वाटचालींसाठी मोलाचा ठरू शकतो. 

So, I wish you all the very best! प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल. कारण केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.